कण्हेरीच्या फुला, तुझा पाऊस वेगळा! .... माझा पाऊस वेगळा! नदीतीरी तू तिथं अंगणी मी एकटा! माझा पाऊस सोहळा! ...तुझा पाऊस पाचोळा! कण्हेरीच्या फुला, गावचा पाऊस भारी... बेभान गं सरी! तडातडा गारा ...शमे तहान गं उरी... लाड पाऊस करतो ...मला कुशीत गं घेतो ! तळं साचूनी गं वेडा...जागा नौकेला या देतो ! मला एकटा बघुनी...आज घरात गाठूनी, माझ्या डोळयापरि टिपं, त्यानं छतात गाळूनी, तुझा सांगावा दिला...तोही हळवा झाला... ऊनचटक्याचा सोस... त्याच्या डोळयात वाचला! कण्हेरीच्या फुला, माझा पाऊस गं लळा! . तुझा पाऊसच झळा!! गावचा पाऊस म्हणे रानीवनी जातो! तुझ्या गोडीनं गं धुंद चिंब चिंब होतो ! ताल पाऊस धरतो ...माझ्या कौलावरी गातो ! तुझ्या रंगात न्हाऊनी ...मनामनात नाचतो !! तुझ्याविना फुलण्याचा माझ्या अंगणाला शाप ! व्याप पावसाला किती! ...तुला नदीतीरी ताप ! तुझा नकार घेऊनी... तो गं वळवाचा आला... अस्सा विरह सोसेना ... तो गं पुरा कोसळला !! कण्हेरीच्या फुला, माझा पाऊस गं भोळा ! ...तुझा पाऊस गं चाळा !! नदीतीरी तू तिथं अंगणी मी एकटा! माझा पाऊस सोहळा! ...तुझा पाऊस पाचोळा! कण्हेरीच्या फुला, तुझा पाऊस वेगळा! .... माझा पाऊस वेगळा!
geetmanjusha.com © 1999-2020 Manjusha Umesh | Privacy | Community Guidelines
Prajakta Gavhane
Umesh Gawade