अडगळीच्या जागी... अगदी एकांतवासात... त्या बुरुजाच्या पायथ्याशी... जिथे सूर्य अस्ताचलाला जातोय, तिथेच... गडाच्या माचीवर, शांत निवांत पहुडलेली एकुटवाणी समाधी आहे ! मी पांथस्त, जेव्हा त्या वाटेने जातो, तेव्हा समाधीवरील फुले माझ्याकडे पाहून विस्मयानं हसतात रानवेलीच्या वेढयाने, जेव्हा समाधी झाकोळली जाते, तेव्हा सायंप्रहरीचा वारा ताटव्यातून त्या फुलांना स्पर्शून हलकेच खाली खोल दरीत विसावतो त्या वाऱ्याच्या अल्वार झुळकीसोबत समाधीवरील फुलांची पखरण होते ! नजीकच डवरलेला हा सोनचाफा दिसतोय? म्हणे त्याच्या बुंध्याशी आजही अगदी निश्चलपणे तो समाधीतील महापुरूष विसावला आहे ! अनंत दिवसांच्या चिरनिद्रेत !! पराक्रमाची जेव्हा शर्थ केली होती, म्हणे रक्ताच्या सडयानेच इथली माती भिजली होती आज त्याच रक्ताच्या थेंबाथेंबातून इथे सोनचाफा बहरलाय ! आणि तोही किती इमानी ! नित्य बरसून विराणी गातोय .. धुळीला मिळालेल्या इतिहासाची !
geetmanjusha.com © 1999-2020 Manjusha Umesh | Privacy | Community Guidelines