याही वर्षी पानझड झालीच ! झाडं कशी ओकीबोकी दिसतात नाही ! काळयाशार मेघाला चोच घासत बसणाऱ्या चातकासारखी ! काहीही असो... याही वर्षी पानझड झालीच ! नको वाटते नाही पानझड ! झाडं कशी विद्रूप दिसतात ! लाल पिवळी बावरी फुलं... उगीचंच निखळतात ! पानाफांद्यांचं मेतकूट कसं बरं एका दिवसात फिस्कंटलं? डवरलेलं मोहक झाड घरटयासकट विस्कंटलं !! झाडंही उपवास करत असावं ! नसेल, तर निदान तसं दाखवंत तरी असावं ! उगाच का ना हुक्की येते त्याला कफल्लक होण्याची? का देऊन देऊन दमलेल्या त्याला गरज वाटते थांबण्याची! धरणीच्या गर्भातून शोषून शोषून ते उत्तर शोधंतच असणार... आभाळाकडे एकटक बघत हताश मुकाट बसणार ! त्यालाही शिसारी येत असावी... घेणाऱ्याच्या हातांची ! हपापलेल्या, भुकाळलेल्या अस्ताव्यस्त गरजांची !! मुकं बिचारं निष्पर्ण झाड !! झडलं असेल वर्षातून कधीतरी... त्याला तेवढीही मुभा द्यायची नाही? झाडासारखंच झाड बिचारं... पानंही पानांसारखीच ! सख्य असो वैर असो, "पानझड" आलीच !
geetmanjusha.com © 1999-2020 Manjusha Umesh | Privacy | Community Guidelines