मंदिरात गेलो..... फक्त दर्शनासाठी ! बाहेर येताच गराडा पडला... "काय मागितलं? खरं सांग, काय मागितलंस?" "काहीच नाही ! सारखं काय मागत राहायचं??" सरळ साधं उत्तर ! पण छे ! त्यांना पटेल तर शपथ ! तसे हट्टी आहेत ते ... पापणी हातावर घेऊन सतत काही ना काही मागतंच असतात... कित्ती केवढाल्ल्याला ईच्छा त्या! पण साऱ्या कशा एकवटून राहिल्याहेत... फक्त एकाच प्रेरणेकडे !! असो . तिथून निघणार ... तो समोर भिक्षुक चिल्लरचा खणखणाट झाला, तसा तिने हात वर केला आशीर्वादासाठी ! ना माझा नमस्कार दिसला तिला ...ना पैसा ! तरीही न मागताच दुवा दिल्या तिने कदाचित लाभतीलही मला त्या ! कोण जाणे? समोरच्या बुडूख अंधारात, कित्येक स्वप्नं पाहिली असतील तिने ! साकार होण्यासाठी कदाचित माझ्या नशीबाला बहाल करू पहात असावी ती... काहीही असो, मला मनापासून बरं वाटलं दर्शनाने ! सोबत तिचे शब्दही कानात घुमत राहिलेच, "काळजी घे !" दोनच शब्द ..... पण काळजाला भिडले.. रस्ता ओलांडताच अश्रूंचा बांध फुटला कधीकधी आसवांनाही काही कारण लागत नाही... हा देव तरी कसा ए ना ... अगदी दाट धुक्यासारखा ! समोरचं नीटसं दाखवतही नाही ! आणि उजाडल्यावर रहातही नाही !!
geetmanjusha.com © 1999-2020 Manjusha Umesh | Privacy | Community Guidelines