त्या उजाड माळरानावर... तळपत्या ऊन्हात... मी नीरस उभा ! जीर्ण बुरूजांची लक्तरं वेशीवर, अंगी पेव निवडुंगाचा ! तरीही लोक म्हणतात, "वाडा चिरेबंदी बघा!" किती पिढया इथं पाहिल्या... सुख दुःखाच्या लाखोल्याही इथंच वाहिल्या! दशकोन्दशकं मीच पाहिलेत वंशावळयांचे अस्त! कुठे उरलंय माझं रूपडं तरी? तेही झालंच की जमीनदोस्त! भेंडयातून उगवणारी रोपं... आज क्षणिक होईना डवरतात... ढासळलेल्या पडक्या भींती... त्याच काय तो पहारा देतात! पण मी...मी अनंत वर्षांच्या छायेत शापीत उध्वस्त उभा! जीर्ण बुरूजांची लक्तरं वेशीवर, अंगी पेव निवडुंगाचा ! तरीही लोक म्हणतात, "वाडा चिरेबंदी बघा!" आज 'माझे' म्हणून कोण आहे इथे? नुसती दुःखाची ग्लानी आणि विरहाची गीते! सकाळची कोवळी उन्हे शुभ वाटतात ना तुम्हाला? माझ्या एकांताचा भंग करून डिवचतात ती मला! या अंधाराच्या गर्तेतून कधीच उठू नयेसं वाटतं कितीही विसरू म्हटलं तरी नको नको तेच आठवंत रहातं असली कोरडी कोरडी उजाड सकाळ करपून काढतेय माझी त्वचा! जीर्ण बुरूजांची लक्तरं वेशीवर, अंगी पेव निवडुंगाचा ! तरीही लोक म्हणतात, "वाडा चिरेबंदी बघा!" सोनसरीची पितळी झिलई, जी कोणेकाळी इथल्या पंगतींनी तृप्त होती, बोरमाळ-गरसूळ...एवढंच काय, तर पोळयाची झूलही सोन्याने मढलेली होती, भरभरून वाहणारी ताकाची चरवी अन् वाडाभर भारून उरणारी मनाची श्रीमंती आज एकाएकी या भग्न कोनाडयांत पार आटून गेलीए मी एकटाच तेवढा त्या ऋणाईत नेमस्त उभा! जीर्ण बुरूजांची लक्तरं वेशीवर, ...अंगी पेव निवडुंगाचा ! तरीही लोक म्हणतात, "वाडा चिरेबंदी बघा!" नाही... माझा हट्ट नाही, पुन्हा उभं रहाण्याचा! कडवटलेली भाषा माझी, तुम्ही समजून घेण्याचा! नकोच तो गुंता, पुन्हा गुंतत जाण्याचा, लाडकी दुडूदुडू पावलं नजरेदेखत परकी होण्याचा! नाही, ...नाही उगीच फिरकू नका माझ्याकडे... उपरती म्हणूनसुध्दा! आता मी शापच देणार तुम्हाला... विरहाचा अन् वार्धक्याचा! कारण या उजाड माळरानावर.. वर्षोन्वर्षे मी तसाच सोसत उभा! जीर्ण बुरूजांची लक्तरं वेशीवर, ...अंगी पेव निवडुंगाचा ! तरीही लोक म्हणतात, "वाडा चिरेबंदी बघा!"
geetmanjusha.com © 1999-2020 Manjusha Umesh | Privacy | Community Guidelines