आता कुठे हवेत निस्तेजता जाणवू लागलीए ! जेव्हा हवेत उष्ण उन्हाच्या झळा जाणवतात, तेव्हा परिसर कसा ओकाबोका वाटतो नाही...! नदीच्या निळयाशार पाण्याचा काळया पत्थराला जेव्हा स्पर्श होतो, खळाळत्या पाण्यालाही अवखळ वाऱ्याची साथ लाभते, हलके हलके नदीभोवती हिरव्याकंच वेलींचे कुंपण पडते, त्या हिरव्या घनगर्द वनराईत भारून राहिलेला तोच अस्पर्शित गारवा... माझ्या आसुसलेल्या मनाला, पुन्हा एकवार तीच गारेगार भुरळ घालतो... तसा एकाएकी हवेत मंद सुवास दाटतो ! नदीकपारीत लाल-गुलाबी ताटवे फुलारतात ... उगवतीची कोवळी उन्हे पिऊन, नदीच्या सुस्त घाट-शीळांवर नीरव विराण पठारांवर, एकाएकी रंगांचीच उधळण होते ! तसं फारसं कुणी वाट बघत नाहीच त्यांची, तरीही अचानक येण्यातली गंमत ती मात्र सवयीनं जपतात ! वाट बघणारा विरळाच असतो ... माझ्यासारखा... त्याला अगदी सुखावून सोडतात ती... नुसत्या दर्शनानं...! न मागताच जणु उभारी देतात मनाला, माझ्यासाठीच आल्याच्या थाटात, माझीच होऊन जातात... अतिनाजूक... अगाधसुंदर कण्हेरीची फुले !!
geetmanjusha.com © 1999-2020 Manjusha Umesh | Privacy | Community Guidelines