Prajakta Gavhane

Prajakta Gavhane's Lyrics

Tanda Chalalaa / तांडा चालला

आज इथे तर उद्या तिथे !
वणवण चालूच आहे
पोटाची खळगी भरण्यासाठी
विंचवाच्या पाठीवरही बिऱ्हाड आहे !

रूणझुणत्या पावलांनी 
दूरवर घुंगरांचा आवाज घुमतोय,
पोरी-बाळी - मायलेकी... आडोशाला संगव्याच्या
सारा संसारच बैलगाडीत मावतोय !
अंगावरच्या वेडया वाकडया लक्तरांनी
लाज कधीच फाडून टाकली आहे... 
कारभारीही अनवाणीच... 
गरीबीवर आसूड तेवढा ओढतो आहे !
दूरदूर माळरानावर तांडा चालला आहे !

ही भटकंती अशीच चालू रहाणार
जोवर मिळत नाही निवारा..
दूरवर कुठेतरी म्हणे वसंत फुलतोय..
इथे मात्र कायमचाच वैशाखवणवा !
इथली चूल सरपण असूनही विझली आहे...
पेटणार तरी कशी? ...विस्तव नको?
राखेच्या आडोशाला आतल्याआत
निखारा तेवढा धुमसत आहे !
कसा का असेना,
झगडत-पेटत-विझत-बुझत...
ग्रीष्मातही दूर दूर...
तांडा चालला आहे

चाकं निखळंतच आली आहेत म्हणा,
आऱ्या तेवढया शाबूत आहेत !
जुना कारभारी जाणार...
नवीन वाटाडया तयारच आहे !
वर्षामागून वर्ष ही नुसतीच सरत जाणार...
आडवळणाच्या जुन्या वाटा दिसेनाशा होणार...
अंधारातच गाव कुठंतरी ठिपका होऊन रहाणार !
प्रकाशाची चलती होणारच...
जरी दिसेनाशा झाल्या दिशा !
कुणास ठाऊक पुढे काय...
आशा ! आशा ! नि फक्त आशा
गरीबी काही केल्या सुटत नाही...
नव्हे सोडतच नाही ......की सोडवत नाही ?
खरं खोटं देवासच ठाऊक, कोडं कधी उलगडतच नाही !

फड ऊठू लागलेत आता...
म्हणजे तुटूच लागलेत म्हणा ना!
राहुटीचा काळदेखील संपला! संपवला!!
वैशाख-वणवा सरत चालला...
कारभारी परतीचा वेध घेऊ लागला...
पुन्हा नव्या दमानं शिड ऊभारू लागला !
पुन्हा एकदा माळरान ओसाड भकास भासणार...
दिव्यालाही कधीतरी प्रकाशाचं स्वप्नं पडणार !
अनवट वाटा रित्या होणार...
गरीबीशी लढा चालूच रहाणार... अगदी निकराचा !
माहीत नाही... माहीत नाही कोण हरणार?... कोण जिंकणार??
वणवण तोवर चालूच राहाणार...
जुन्याच वाटांनी ...
पुन्हा पुन्हा एकाकी...
तांडा चालतच रहाणार...
Prajakta Gavhane liked this

Additional Information

गीतकार : शंकर जांभळकर , अभिवाचन: डॉ. अमोल कोल्हे, संगीतकार : तेजस चव्हाण, गीत संग्रह/चित्रपट : कण्हेरीची फुले (२०१२) / Lyricist : Shankar Jambhalkar, Narrator : Dr Amol Kolhe, Music Director : Tejas Chavhan, Album/Movie : Kanherichi Phule (2012)

Prajakta Gavhane Lyrics Submitted By

Prajakta Gavhane

Prajakta Gavhane

December 24 2012

geetmanjusha.com © 1999-2020 Manjusha Umesh | Privacy | Community Guidelines