शतकांच्या यज्ञातून उठली, एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृद्यामधुनी, अरुणोदय झाला
शिवप्रभुंची नजर फिरे अन् उठे मुलुख सारा
दिशा दिशा भेदीत धावल्या खड्गांच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र विजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा चिरा ढळला
कडेकपारी घुमू लागले विजयांचे गान
जळल्या रानांतुनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे रूप शक्तियुक्तिचे
हा तेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला
गंगा सिंधू यमुना गोदा कलशांतून आल्या
शिवरायाला स्नान घालूनी धन्य धन्य झाल्या
धीमी पाउले टाकीत येतां रुद्राचा अवतार
अधीर हृदयांतुनी उमटला हर्षे जयजयकार
शिछत्रपतींचा जय हो !
श्रीजगदंबेचा जय हो !
या भरतभूमिचा जय हो !
जयजयकारातूनी उजळल्या शतकांच्या माला
You must be logged in to comment!